कमी दाबाचे क्षेत्र तयार, राज्यातील या जिल्ह्यात जोरदार पाऊस – डॉ. रामचंद्र साबळे
डॉ. रामचंद्र साबळे यांनी बुधवार, दिनांक १५ ऑक्टोबर ते शनिवार, दिनांक १८ ऑक्टोबर या चार दिवसांसाठी महाराष्ट्राचा सविस्तर हवामान अंदाज वर्तवला आहे. या चार दिवसांत महाराष्ट्रावरील हवेचे दाब १००६ हेक्टा पास्कल इतके कमी राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान ३०°C पर्यंत वाढले आहे. अरबी समुद्र, हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागरावरही कमी दाबाचे क्षेत्र (low pressure area) निर्माण होत असून ते शनिवारपर्यंत कायम राहील. प्रशांत महासागरात पाण्याचे तापमान कमी झाल्यामुळे तिकडील सर्व बाष्प दक्षिणेकडील भारताच्या दिशेने खेचले जाईल, ज्यामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे अशी माहिती रामचंद्र साबळे यांनी दिली.
या हवामान बदलामुळे राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये हलक्या स्वरूपात तर काही जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. प्रादेशिक स्तरावर, कोकणात हलक्या स्वरूपात पाऊस अपेक्षित आहे. तर, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्र या विभागातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. हा पाऊस केवळ ज्या भागात हवेचे दाब कमी असतील तेथेच होईल, बाकी ठिकाणी उघडीप राहू शकते.
















