पावसाचा जोर वाढणार, पुढील 3 ते 4 दिवस या जिल्ह्यात पाऊस
राज्यात पुढील तीन ते चार दिवस पावसाचा जोर वाढणार असल्याचा हवामान अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे. सोमवारी मान्सूनने राज्याच्या बहुतांश भागातून माघार घेतली असली तरी, कमाल तापमानामुळे ‘ऑक्टोबर हीट’चा अनुभव येत आहे.
याच दरम्यान, पश्चिम मध्य अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आणि बंगालच्या उपसागरात दक्षिण बांगलादेश आणि आसपासच्या प्रदेशात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यात पुन्हा पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे.
मंगळवार आणि बुधवारचा सविस्तर अंदाज
मंगळवारी (आज), मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज आहे. यात सांगली, सातारा, नांदेड, लातूर, धाराशीव, अकोला, अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांसह जोरदार पावसाची शक्यता आहे. तर सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे.
बुधवारी मात्र कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशीव, आणि विदर्भातील अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये विजा आणि वाऱ्यांसह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
गुरुवारचा अंदाज आणि मान्सूनच्या माघारीची स्थिती
पुढील ३-४ दिवसांच्या अंदाजानुसार, गुरुवारी रायगड, रत्नागिरी, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अकोला, अमरावती, बुलढाणा, गडचिरोली, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि वाऱ्यांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
दरम्यान, मान्सूनने सोमवारी महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून माघार घेतली आहे आणि त्याची परतीची सीमा कारवार, कालबुर्गी, निजामाबाद, चांदबली आणि कंकर दरम्यान आहे. मान्सूनच्या परतीला पोषक हवामान असल्याने, पुढील दोन दिवसांत तो संपूर्ण देशातून निरोप घेण्याचा अंदाज आहे.
















