बाजारात सोयाबीनचे दर हमीभावापेक्षा कमी असल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आधारभूत खरेदीकडे लागल्या आहेत. दरवर्षी दिवाळीपूर्वी हमीभावाने खरेदीला सुरुवात होते. यंदा मात्र सोमवारनंतर नोंदणी प्रक्रिया व त्यानंतर खरेदीला सुरुवात होण्याची शक्यता पणन विभागाच्या सूत्रांनी वर्तवली आहे.
सोयाबीनला गत वर्षीच्या तुलनेत यंदा ३३६ रुपयांची वाढ करून शासनाने ५ हजार ३२८ रुपये हमीभाव जाहीर केला. यंदा ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टिमुळे सोयाबीनचे पीक हातचे गेले. शिल्लक राहिलेल्या पिकातून एकरी दीड ते दोन क्विंटल उतारा आला. अतिवृष्टिग्रस्त भागात सरासरी तीन क्विंटलच्या वर एकरी उतारा आला नाही.
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
किमान यंदा तरी दिवाळीत हमीभाव मिळेल या आशेवर शेतकरी होता. मात्र यंदा दिवाळी तोंडावर आली, तरी अद्याप हमीभाव केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांनी दिवाळी साजरी करण्यासाठी लागणाऱ्या पैशांची सोय म्हणून खुल्या बाजारात सोयाबीन विक्रीवर भर दिला आहे. त्यामुळे बाजारात सोयाबीनची आवक वाढली आहे.
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
सध्या खुल्या बाजारात सोयाबीनला ३००० ते ४२०० रुपयांपर्यंत प्रति क्विंटल दर मिळत आहेत. या व्यवहारात शेतकऱ्यांचे पंधराशे ते दोन हजार रुपयांचे नुकसान होत आहे. गेल्या वर्षी हमीदरात खरेदीची सुरुवात ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात झाली होती. मात्र, यंदा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि प्रशासकीय प्रक्रियेमुळे खरेदीस उशीर होत असल्याची चर्चा आहे.
जिल्हा सहकारी संघ, वेअरहाउसिंग कॉर्पोरेशन व मार्कफेड यांच्यात समन्वयाचे काम सुरू असून केंद्रांची यादी आणि कोटा निश्चितीचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात आले आहे. यासंदर्भाने अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध होईपर्यंत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे सात-बारा, आधार कार्ड आणि बँक पासबुक तयार ठेवावीत, अशी सूचना देण्यात आली आहे.
बाजारातील एकंदरीत स्थिती बघता शासनाने मध्य प्रदेशच्या धर्तीवर भावांतर योजना राबवावी, अशी मागणी शेतकरी स्तरातून होत आहे. मध्य प्रदेशने भावांतरसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे.