वादळी प्रनाली ; जोरदार पावसाचा धुमाकूळ, या तारखेनंतर मुसळधार – मच्छींद्र बांगर
मच्छींद्र बांगर यांच्या अंदाजानुसार सध्या वातावरणात दोन मुख्य प्रणाल्यांचा प्रभाव दिसून येतो आहे. एक बंगालच्या उपसागराच्या पूर्व भागात, तर दुसरी अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला विकसित होत आहे. बंगालच्या उपसागरातील दुसरी प्रणाली विकसित होण्याची शक्यता असल्याने, पर्यायाने दक्षिण भारतात पावसाचे प्रमाण वाढेल.
महाराष्ट्रात अरबी समुद्रातील प्रणालीमुळे १९ तारखेपासून ते २३, २४ आणि २५ तारखेपर्यंत पावसाचे प्रमाण वाढेल. यानंतर थोडी विश्रांती घेऊन पुन्हा बंगालच्या उपसागरातील प्रणालीमुळे ३० तारखेपासून पुढे दोन-तीन दिवस पावसाचे वातावरण तयार होईल असा अंदाज मच्छींद्र बांगर यांनी दिलाय…
येत्या दिवसांतील पावसाची शक्यता
आज तसेच १६, १७ आणि १८ तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण अतिशय तुरळक राहील. मात्र, केरळजवळ विकसित होणाऱ्या नवीन प्रणालीचा प्रभाव १९ तारखेपासून वाढेल आणि राज्यात पुन्हा पावसाळी परिस्थिती निर्माण होईल. १९ तारखेपासून पश्चिम महाराष्ट्राचा दक्षिणी पट्टा आणि मराठवाड्याच्या दक्षिणी पट्ट्यात हवामानात बदल जाणवण्यास सुरुवात होईल.
२० ते २५ ऑक्टोबर दरम्यानचा सविस्तर अंदाज
अरबी समुद्रात विकसित होणाऱ्या वादळी प्रणालीमुळे महाराष्ट्रात पाऊस होईल. २० तारखेला संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत या प्रणालीचा परिणाम दिसून येईल. २१ आणि २२ तारखेला मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकण या विभागात पावसाची शक्यता आहे. २३ तारखेपर्यंत मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस कायम राहील. (मच्छींद्र बांगर)
त्यानंतर २४ आणि २५ तारखेला पावसाचे प्रमाण कमी होईल, मात्र ही वादळापूर्वीची शांतता असण्याची शक्यता आहे. २५ तारखेनंतर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकण, तसेच नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालनाचा दक्षिणी भाग, नांदेडचा पश्चिमी भाग, बीड, लातूर, धाराशीव (उस्मानाबाद), सांगली, सातारा, पुणे, अहमदनगर आणि कोकणातील सर्व जिल्ह्यांवर पावसाचा अधिक प्रभाव राहील अशी माहिती बांगर यांनी दिली.
अतिवृष्टीचा धोका आणि धोक्याची चाहूल
२५ तारखेनंतर वातावरण पुन्हा बदलायला सुरुवात होईल. जर बंगालच्या उपसागरातील नवीन प्रणाली महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यात आली, तर दक्षिण मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होईल. या प्रणालीला अरबी समुद्रातून बाष्पाचा पुरवठा होणार असल्याने संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या पावसाचे वातावरण बघायला मिळेल. (हवामान अभ्यासक मच्छींद्र बांगर)
२६ ते ३० तारखेपर्यंत अतिवृष्टीची शक्यता आहे. सोलापूर, धाराशीव, लातूर, बीड, अहमदनगर, पुणे पूर्व, सातारा पूर्व आणि सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर हे जिल्हे अतिवृष्टीचे मुख्य केंद्र असू शकतात अशी माहिती मच्छींद्र बांगर यांनी दिली आहे..
ईशान्य मान्सूनचा परिणाम
यावर्षी पहिल्यांदा ईशान्य मान्सूनचा महाराष्ट्रावर इतका परिणाम बघायला मिळत आहे. हे डिप्रेशन संपूर्ण वर्षभरातील सर्वात त्रासदायक डिप्रेशन ठरण्याची शक्यता आहे, ज्यात वाऱ्यांचा वेग ताशी ४० किमी पर्यंत पोहोचलेला असेल आणि पावसाचे प्रमाण अधिक असेल. अतिवृष्टीमुळे नद्यांना पूर येणे, पाणी प्रकल्पातील विसर्ग वाढणे अशा घटना घडतील.
हा १५ दिवसां पुढील अंदाज असल्याने, यात बदल संभवतात. नदीकाठी असलेल्या लोकांनी तसेच नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहावे आणि आपली जनावरे सुरक्षित ठेवावीत असे बांगर म्हनाले…
















